
सामना प्रतिनिधी । जळगाव
भाजप नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आयोजित केलेल्या मुक्ताई शुगरच्या कार्यक्रमासाठी राज्यातील एक कॅबीनेट व एक राज्यमंत्र्याला बोलविण्यात आले असुन निमंत्रण पत्रिकेत नगर पालिका, जिल्हा परिषद पदाधिकार्यांसह शासकीय अधिकारी, खासदार, आमदारांची नावे टाकण्यात आली आहेत. मात्र जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत न टाकता डावलण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजपची ‘भाऊ’ बंदकी या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि. कारखान्याचा पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी मुक्ताईनगर जवळील घोडसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. खडसेंच्या होमपीच मध्ये होणार्या या कार्यक्रमासाठी रोहयो मंत्री जयकुमार रावल व सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांना पाचारण करण्यात आले असुन या दोन्ही मंत्र्यांचे अधिकृत शासकीय दौरे प्राप्त झाले आहेत.
या कार्यक्रमासाठी काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील दोन खासदार, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार व अर्धा डझनच्या वर सदस्यांची नावे टाकण्यात आली आहे. खडसेंच्या कन्या रोहणी खेवलकर यांच्यासह कारखान्याचे संचालक हे निमंत्रक असून एकनाथ खडसे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. भाजपच्या झाडुन पुसून सार्या पदाधिकार्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान असताना जलसंपंदामंत्री तथा जिल्ह्यातील जामनेरचे आमदार गिरीष महाजन आणि चाळीसगावच्या आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेख नाही. एकनाथ खडसेंच्या कार्यक्रमात गिरीष भाऊंना डावलण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
कधीकाळी खडसेंचे ज्युनिअर असलेले महाजन मुख्यमंत्र्यांशी लगट करत वरचढ बनले आहेत. या पुर्वी झालेल्या कार्यक्रमात गिरीष महाजनांच्या नावाचा उल्लेख केला जात होता. खडसेंच्या वाढदिवसाला महाजनांनी दांडी मारली होती. दरम्यान सोमवारी मुक्ताईनगरात आयोजित कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना डावलण्यात आल्याने भाजपमधील दुफळी समोर आली आहे. विशेष म्हणजे आज नागपुरात असलेले जलसंपदा मंत्री महाजन हे उद्या जळगाव व जामनेर येथे दिवसभर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.































































