
सामना प्रतिनिधी । उरण
घारापुरी बेटावर पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या मिनीट्रेन रुळावरून घसरून बुधवारी सकाळी अपघात झाला. मात्र, या अपघातातून प्रवास करणारे देशी-विदेशी पर्यटक थोडक्यात बचावल्याची माहिती घारापुरी बंदर अधिकारी एच.एस.पिंगळे यांनी दिली. वारंवार होणाऱ्या मिनीट्रेनच्या अपघातामुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
घारापुरी बेटावर दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक लेण्या पाहण्यासाठी येतात. गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरी बेटावरील शेतबंदर जेट्टीवर उतरल्यावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी खासगी महेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनी मिनीट्रेनची सेवा पुरविते. साधारण दोन किमी अंतरासाठी पर्यटकांकडून 10 रुपये घेतले जातात. अनेक पर्यटक या मिनीट्रेनच्या प्रवासालाच अधिक प्राधान्य देतात. बुधवारी सकाळी 10 वाजता पर्यटकांना घेऊन जाणारी मिनीट्रेन रुळावरून घसरुन अपघात झाला. सुदैवाने अपघातातून प्रवास करणारे देशी-विदेशी पर्यटक थोडक्यात बचावले आहेत.
खासगी महेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या या मिनीट्रेनला अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात काही विदेशी पर्यटकही जखमी झाले होते. तसेच या मिनीट्रेनला गेल्यावषीही अपघात झाला होता. मध्यंतरी सुरक्षितेत काही त्रुटी आढळून आल्याने काही दिवस मिनीट्रेन बंद ठेवण्यात आली होती. वारंवार मिनीट्रेनच्या होणाऱ्या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिनीट्रेनचे ऑडीट आणि चालकाच्या अनुभवाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र, या अपघातातून प्रवास करणारे देशी-विदेशी पर्यटक बालंबाल बचावले आहेत. त्यानंतर मिनीट्रेन डब्बे रूळावर चढविल्यानंतर प्रवासी वाहतूक दुपारनंतर सुरळीतपणे सुरु करण्यात आल्याची माहिती घारापुरी बंदर अधिकारी एच.एस.पिंगळे यांनी दिली.























































