
सामना ऑनलाईन, मुखेड
आईने अभ्यास कर म्हणून तगादा लावल्याने इयत्ता दहावीत शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थ्यांने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात दुपारी चार वाजता घडली. या परिसरात घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील हुतात्मा माधव विद्यालयात १५ वर्षीय योगेश पांचाळ हा इयत्ता दहावी वर्गात शिकत होता. योगेशचे आई-वडील मुलाच्या शिक्षणासाठी मुखेड शहरातील डॉ.इंगोले हॉस्पिटल लातूर रोड येथील दुसर्या मजल्यावर एक घर भाड्याने घेऊन राहायला आले. योगेशच्या आईने दहावीचे वर्षअसल्याने, अभ्यास कर म्हणून तगादा लावला. याचा राग मनात धरून योगेश पांचाळ या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसल्याचे पाहून गुरुवारी दुपारी चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. आई ही अंगणवाडीमध्ये सावरगावला नोकरी करतात तर वडील मजुरी करतात. आई नोकरी करुन मुखेडला घरी आल्यावर मुलाने आत्महत्या केल्याचे दिसले, योगेश हा आई, वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.




























































