चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या! शिवसेनेच्या रणरागिणींची नौपाडा पोलिसांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला थेट फासावर लटकवा, अशी मागणी शिवसेनेच्या रणरागिणींनी आज नौपाडा पोलिसांकडे केली. रामलू यादव असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. त्याच्यावर पोलिसांतर्गत गुन्हा दाखल करून याबाबतचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पीडित मुलीचे वडील हे बिगारी काम करत असून ते तेलंगणा राज्यात राहणारे आहेत. काम शोधण्यासाठी ते ठाण्यात आपल्या मुलीसह आले होते. वाजीप्रभू देशपांडे रोडवरील सृष्टी कन्स्ट्रक्शन या बांधकाम साइटवर रामलू यादव (४५) याने सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांच्या नेतृत्वाखालील रणरागिणींनी आज नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची भेट घेतली. तसेच अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन सादर केले.

यावेळी प्रतिभा भांगरे, अनीता प्रभु, वैशाली शिंदे, राजश्री सुर्वे, सायली गुंजाळ, सानिका राऊत, आशा शिंदे, शुभांगी चव्हाण, सुचिता कदम, संगीता जाधव, सायली चांदवडे, रोला काझी, जयश्री धामणसे, सुलभा जाधव, ज्योती मोरे, संगीता सावळे, अपर्णा भोईर, रिंकिका शुभेदार, अर्चना शाहिर, प्रियंका सुर्वे, कविता सिनलकर आदी उपस्थित होते.

पीडित मुलीला सरकारने आर्थिक मदत तसेच वैद्यकीय उपचार द्यावेत तसेच ठाणे शहरातील बांधकाम साइट्सवर काम करणाऱ्या कामगारांची पोलीस पडताळणी सक्तीची करावी, अशीही मागणी शिवसेनेने केली आहे.