धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कल्याणमधून फूस लावून पळवले; अकोला रेल्वे स्थानकात सोडून नराधम पसार

घराबाहेर फिरण्यासाठी आलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून एका नराधमाने कल्याणहून रेल्वेने अकोल्याला नेले. धक्कादायक बाब म्हणजे प्रवासादरम्यान धावत्या ट्रेनमध्ये मुलीवर बलात्कार करून तिला अकोला रेल्वे स्थानकात सोडून नराधम पसार झाला. या संतापजनक घटनेने खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत.

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या मुलीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. 29 जून रोजी ही मुलगी कल्याण स्टेशन परिसरात फिरण्यासाठी आली होती. काही वेळानंतर घरी जात असताना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने तिला हेरले. तिच्याशी ओळख वाढवली आणि आरोपी तिला कल्याण रेल्वे स्थानकात घेऊन आला. ट्रेनमधून फिरून येऊ असे गोड बोलून त्याने अकोल्याकडे जाणारी एक्स्प्रेस पकडली. इगतपुरी ते अकोलादरम्यान त्याने या मुलीशी लगट करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो तिला त्याच्या अकोला येथील घरी घेऊन गेला. मात्र कुटुंबीयांनी मुलीला घरात घेण्यास नकार दिल्याने आरोपीने मुलीला पुन्हा अकोला रेल्वे स्थानकात आणले. थोड्या वेळात येतो असे सांगून तरुण पसार झाला. दरम्यान बराच वेळ एकाच जागी बसलेली मुलगी पाहून रेल्वे पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली.

पोलिसांची दोन पथके मागावर कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याचे कल्याण रेल्वेचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितल धक्कादायक म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपासही मानपाडा पोलीसच करत आहेत.

पीडितेची कर्मकहाणी ऐकून पोलीसही हादरले
मुलीवर ओढवलेली परिस्थिती पाहून पोलीसही हादरले. गंभीर घटनेची दखल घेत अकोला रेल्वे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसाकडे वर्ग करत पीडित मुलीला कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाल करण्यात आले. मुलीला कल्याणला आणल्यानंतर जबाब आणि वैद्यकीय तपासणी करून तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.