
सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीमुळे वाहवत गेलेल्या तरुणीला मोठी किंमत चुकवावी लागली. इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवत एका लंपट तरुणाने अल्पवयीन मुलीला कॅडबरीचे आमिष दाखवून तिच्याशी अतिप्रसंग केल्याची घटना नेरळमध्ये घडली.
ऑक्टोबर २०२५ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी व पीडित मुलीची ओळख झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी असताना आरोपी तेथे पोहोचला. त्याने तिला घराबाहेर बोलावून कॅडबरी चॉकलेट दिले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला, अशी तक्रार पीडित तरुणीने दिली. त्यानंतर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना समोर येताच परिसरात संताप व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करत आहेत.
अमली पदार्थांची विक्री करणारी महिला जाळ्यात
पनवेल – सानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने १८ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. फातिमा अल्लाउद्दीन शेख (३९) असे महिलेचे नाव आहे. गस्त घालत असताना बस डेपोच्या गेटजवळ ही महिला संशयास्पद हालचाल करत असताना आढळली. या महिलेकडे हेरॉईन असल्याचे समोर आले आहे.
























































