
कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून वॉर्डबॉयने तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी वॉर्डबॉय अंकुश मच्छिंद्र पवार (वय 22, रा. तीन बत्ती चौक, राजारामपुरी) याला अटक केली आहे.
अनाथ मुलांचे संगोपन करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करणाऱया एका सामाजिक संस्थेत संबंधित अल्पवयीन मुलगी राहत होती. कोरोनाची बाधा झाल्यामुळे 15 मे रोजी शिवाजी विद्यापीठ परिसरातील एका खासगी कोरोना सेंटरमध्ये या संस्थेतील मुला-मुलींना उपचारासाठी दाखल केले होते. या कोरोना सेंटरमध्ये अंकुश पवार हा वॉर्ड बॉय म्हणून काम करीत होता.
पीडित मुलगी निराधार असल्याचे पाहून अंकुशने तिच्याशी ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखविले. तसेच, तिच्यावर 29 मे रोजी रात्री अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रकार संस्थेच्या पदाधिकाऱयांना सांगितल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.




























































