मीरा रोड येथील मराठी मोर्चाला परवानगी नाकारणारे पोलीस आयुक्त पांडे यांची तडकाफडकी बदली

मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारतानाच आंदोलकांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. गृह विभागाकडून आज तातडीने याबाबत आदेश काढण्यात आले.

परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर त्यांच्या मुजोरीचा निषेध करण्यासाठी मराठी एकीकरण समिती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच मराठीप्रेमी जनतेने मोर्चाची हाक दिली. यासाठी रितसर परवानगीदेखील मागितली. मात्र व्यापाऱ्यांच्या मोर्चाकडे कानाडोळा करणाऱया मीरा-भाईंदर पोलिसांनी मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारली. हा मोर्चा होऊ नये यासाठी नोटिसा काढल्या, दडपशाही करत धरपकड केली. मोर्चेकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात डांबण्यात आले.

पोलिसांच्या जुलूमशाहीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तंतरलेल्या सरकारने आज तडकाफडकी पांडे यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी निकेश काैशिक यांची नियुक्ती केली.

पांडे नेमके कोणाच्या तालावर नाचत होते?

व्यापाऱयांच्या मोर्चाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाईंदर पोलिसांनी तीनशे ते साडेतीनशे मराठी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. अनेक पदाधिकाऱ्यांची मोर्चाआधीच धरपकड करण्यात आली. मधुकर पांडे यांच्या आदेशानेच ही सर्व दडपशाही झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पांडे नेमके कोणाच्या तालावर नाचत होते, असा सवाल केला जात असून मराठी माणसाचा मोर्चा दडपण्यासाठी नेमके कोणते अदृश्य हात कार्यरत होते याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

निकेश कौशिक नवे पोलीस आयुक्त

पांडे यांची तडकाफडकी बदली अप्पर पोलीस महासंचालकपदी (प्रशासन) केल्यानंतर मीरा-भाईंदरच्या आयुक्तपदी निकेश काwशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या वादामुळे कौशिक यांच्यासमोर आव्हान आहे.

व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर त्यांच्या मुजोरीचा निषेध करण्यासाठी मराठी एकीकरण समिती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच मराठीप्रेमी जनतेने मोर्चाची हाक दिली. यासाठी रितसर परवानगीदेखील मागितली. मात्र व्यापाऱ्यांच्या मोर्चाकडे कानाडोळा करणाऱया मीरा-भाईंदर पोलिसांनी मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारली. हा मोर्चा होऊ नये यासाठी नोटिसा काढल्या, दडपशाही करत धरपकड केली. मोर्चेकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात डांबण्यात आले. पोलिसांच्या या जुलूमशाहीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यानंतर तंतरलेल्या सरकारने आज तडकाफडकी पांडे यांची उचलबांगडी करत त्यांच्याजागी निकेश काैशिक यांची नियुक्ती केली.