चेना नदीचे पाणी मीरा–भाईंदरला; ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घऊन चेना नदीचे पाणी अडवून मीरा-भाईंदरला मिळण्याच्या दृष्टीने अभ्यास करावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. तसेच उल्हासनगरच्या वालधुनी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

ठाणे जिह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, नगरविकास, जलसिंचन, मेट्रो आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात बैठक आयोजित केली होती.

मीरा-भाईंदर शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन चेना नदीचे पाणी अडवून शहराला मिळावे यासाठी मागणी होत आहे. या अनुषंगाने अभ्यास करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. घोडबंदर, मीरा-भाईंदर खाडीकिनारा (वॉटरफ्रंट) विकास, अंतर्गत जलवाहतुकीसाठी जेट्टींचा विकास, ठाणे शहरामध्ये कोस्टल रोड, उन्नत रस्ते, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन, समूह पुनर्विकास आदी बाबींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वालधुनीचे प्रदूषण कमी

उल्हासनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असतानाही वालधुनी नदीमध्ये कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नदी प्रदूषित झाली आहे. याबाबत तपासणी करून कार्यवाही करण्यात येईल.

बाहुली प्रकल्प

शहापूरला बाहुली प्रकल्पाचे पाणी गुरुत्व पद्धतीने मिळावे यासाठी कार्यवाही करावी. तसेच घाटनदेवी पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीस नगरविकास मंत्री तथा ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा, सर्व स्थानिक आमदार, सर्व संबंधित विभागांचे सचिव, महानगरपालिकांचे आयुक्त आदी उपस्थित होते. यावेळी आमदार, लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागाविषयीच्या मागण्या मांडल्या.

जलसंधारणाची कामे गतीने

सफाई कामगारांच्या मुलांना नोकरीमध्ये कायम ठेवण्याच्या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. अंबरनाथ- बदलापूर पाणीपुरवठा योजनेवर महिनाभरात तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, जिह्यातील जलसंधारण प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले.

माळशेजला काचेचा स्कायवॉक

माळशेज घाट येथे उत्कृष्ट असा काचेचा स्कायवॉक विकसित करण्याचा प्रस्ताव असून पर्यटनाच्या दृष्टीने देशातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.