मिरजेत गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघोंना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि तलवार बाळगणाऱया दोघांना मिरजेतील चिवटे हॉस्पिटलजवळ अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व गांधी चौकी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. यात गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस तसेच तलवार असा 50 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोहेल उर्फ फसिउल्लाह हसिउल्लाह शहा (वय 27) व अनिल विलास क्षीरसागर (वय 22, दोघे रा. कुपवाड रोड, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिरजेतील चिवटे हॉस्पिटलजवळ दोघांकडे गावठी कट्टा व तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 500 रुपये किमतीची तलवार, 200 रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हा गावठी कट्टा त्यांनी नगर येथून आणल्याचे सांगितले. या दोघांना मिरज गांधी चौकी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.