
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून बंधाऱ्याच्या निकृष्ट बांधकामाला ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत मिऱ्यावासियांनी उद्या समुद्राच्या लाटांनी आमचे संसार समुद्रात वाहून जाऊन आमचे बळी जायची सरकार वाट पहात आहे का? असा सवाल मिऱ्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. प्रजासत्ताक दिनी मिऱ्यावासिय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
पत्रकार परिषदेत सरपंच आरती पाटील, मच्छिमार नेते अप्पा वांदरकर, विकास सावंत,तनया शिवलकर, प्रिया जाधव, बाबा नार्वेकर, दिगंबर कीर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अप्पा वांदरकर यांनी १९६७ पासून मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा इतिहास सांगताना कुणीही मिऱ्यावासियांकडे लक्ष दिले नाही उलट मिऱ्यावासियांना स्थलांतरीत करा असे सांगितले होते. आता पर्यंत ४० कोटी रुपये खर्चूनही अजून बंधारा निकृष्ट असल्याचे सांगून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरपंच आरती पाटील यांनी ग्रामसभेत ठेकेदार के. एस. पवार निकृष्ट दर्जाचे काम करतात असा ठराव केला आहे. तनया शिवलकर आणि विकास पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मांडताना आमच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना सीआरझेडची कारणे दिली जातात. उद्या समुद्राचे पाणी शिरून दुर्घटना होऊ पर्यंत वाट पहाणार का? संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रिया जाधव यांनी सात हजार हून अधिक कुटूंब किनारपट्टीवर भीतीच्या छायेखाली राहात असून उद्याचा दिवस आम्ही पाहू का अशी भीती आमच्या मनात कायम असते. समुद्राच्या लाटांचा लोकवस्तीला मोठा धोका असून सरकारने तात्काळ बंधारा दुरुस्त करावा अशी मागणी केली. बंधाऱ्याचे काम करणाऱ्या अमृता कन्सट्रक्शन आणि को. एस. पोवार यांची चौकशी करावी. किनाऱ्यावर जे दगड आणून टाकले जातात ते योग्य वजनाचे नसतात त्यामुळेच ते वाहून जातात आता किनाऱ्यावर वाळू आणून टाकली आहे ती रहाणार आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. दिनांक २६ जानेवारी येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.






























































