
जपानची पॉर्नस्टार रिना अॅरोना (Rina Arano) हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. इबाराकी प्रांतातील हिटाचियोटा येथील घनदाट जंगलामध्ये झाडाला बांधलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह सापडला तेव्हा तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आता पोलिसांनी हिरोयुकी संपेई (Hiroyuki Sanpei) नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉर्नस्टार रिना अॅरोना (Rina Arano) हिचा मृतदेह 14 जून रोजी जंगलामध्ये सापडला. रिना हिचा मृतदेह नग्नावस्थेत होता. हिरोयुकी संपेई यांच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर रिनाचा मृतदेह सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असून मृत्युपूर्वी दोघांमध्ये खासगी संभाषण झाल्याचीही माहिती मिळत आहे.
रिना अॅरोना (Rina Arano) आणि हिरोयुकी संपेई (Hiroyuki Sanpei) यांची इबारकी प्रांतातील मिटो रेल्वे स्थानकावर 5 जून रोजी भेट झाली होती. यानंतर दोघांनीही ट्विटरवर एकमेकांना खासगी संदेश पाठवले होते. यानंतर संपेई याने अरोनाचे अपहरण करून तिला हिटाचियोटा येथील आपल्या घरी नेले. यादरम्यान 8 जून रोजी रिनाच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. पोलीस तपासामध्ये रिना आणि संपेई यांच्या भेटीची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलीस चौकशीमध्ये आरोपीने रिना अॅरोना हिला आपल्या घरी नेल्याचे कबूल केले. परंतु आपण रिनाला जोरजबरदस्तीने रोखले नव्हते असेही आरोपीने सांगितले. तसेच तिला जवळच्या एका दुकानास सोडल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर ती कुठे गेली याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे आरोपीने सांगितले. मात्र ती तिचा फोन आपल्या घरात विसरून गेल्याचे आरोपीने सांगितले.
दरम्यान, 33 वर्षीय संपेई यानेच 23 वर्षीय रिनाची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रिनाचा मृतदेह कुजलेला होता, परंतु तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. मात्र शवविच्छेदनामध्ये तिच्या मानेचे हाड मोडल्याचे स्पष्ट झाले आहे.






















































