व्यक्ती हरवण्याचे प्रमाण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी शहराबरोबरच ग्रामीण भागातून हरवलेल्या व्यक्तींचा शोध न लागण्याचे गेल्या ५ वर्षातील वाढते प्रमाण हा राहुरी तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला आहे.

सासू सुनेचा वाद, भावा भावातील वाद, आई वडीलांशी होणारे मुले व मुलींचे तात्विक भांडण, या घरातील किरकोळ कारणावरून गेल्या ५ वर्षात राहते घर सोडण्याच्या घटना वाढल्या आहेत. राहुरी तालुक्यात २०१३ ते २०१८ या कालावधीत घरातून निघून जाणाऱ्या व्यक्तींपैकी ९३ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. २०१३ साली ८ तर २०१४ मध्ये घरातून निघून गेलेल्या ९ जणाचा ठावठिकाणा लागलेला नाही.

२०१५ साली गायब झालेले १९ व्यक्ती,२०१६ साली २५ व्यक्ती,२०१७ साली २६ तर ३१ ऑगष्ट २०१८ पर्यंत १३ व्यक्ती घरातून परागंदा झाले. मात्र अद्याप घरी परतलेले नाहीत. २०१३ पासुन २०१८ पर्यंत घरातून निघून गेलेल्या ९३ जणांचा नातेवाईक शोध घेण्यात आला आहे मात्र अद्याप एकाचाही तपास लागु शकलेला नाही. हरवलेल्या व्यक्ती एक ना एक दिवस घरी परततील या कुटंबातील सदस्यांचा अपेक्षा धूसर होत चालल्या आहेत.

राहुरी, कृषि विद्यापीठ, डिग्रस, बारागाव नांदुर, वावरथ, वडनेर, खडांबे, उंबरे, ब्राम्हणी, खडांबे, गोटुंबा आखाडा, तांदुळवाडी, कात्रड, गुंजाळे, राहुरी फॅक्टरी, चिंचविहीरे, गुहा, चिंचोली, कोल्हार खुर्द,म्हैसगाव या भागातील विवाहीत महिला, मुली, पुरूष, लहान मुलांचा हरवलेल्या व्यक्ती मध्ये समावेश आहे.