
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
दादा मी प्रेग्नंट आहे… अशी पोस्टर्स पुणे तसेच पिंपरी-चिंचवड भागात लावण्यात आली होती. या पोस्टर्सची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता नवी मुंबईतही ‘मिसिंग’ अशी अक्षरे असलेले गूढ पोस्टर्स लावण्यात आले आहेत. जागोजागी दिसत असलेल्या या पोस्टर्समुळे खळबळ उडाली असून ती नेमकी कोणी व का लावली याचा शोध सुरू आहे.
पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील पोस्टर्सचे लोण आता नवी मुंबईपर्यंत पोहोचले आहे. या पोस्टर्समध्ये बुरखाधारी महिला असून त्याच्या खालीच मिसिंग असे इंग्रजीत लिहिले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईटमधील या पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधले असून ही एखाद्या चित्रपटाची किंवा नाटकाची जाहिरात आहे काय याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
पोलिसांचा शोध सुरू
अशा प्रकारचे गूढ पोस्टर्स लावून लोकांचे लक्ष वेधायचे व आपली जाहिरात करायची हा अलीकडच्या काळातील काही जाहिरात कंपन्यांचा फंडा आहे. या आधीदेखील ‘शिवडे आय ऍम सॉरी’ या पोस्टर्सने खळबळ उडवून दिली होती. आता ‘मिसिंग’ची पोस्टरबाजी कोणी केली व त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा शोध नवी मुंबईतील पोलीस घेत आहेत.

























































