
उत्तर प्रदेशचे राजधानी लखनौमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिलेचा मृतदेह गटारात सापडला आहे. चौकशीनंतर हा मृतदेह महिला कॉन्स्टेबल रुचि सिंह हिचा असल्याचे उघड झाले आहे. यामुळे पोलीस वर्तुळामध्ये हडकंप उडाला आहे. प्राथमिक चौकशीमध्ये हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचि सिंह हिची फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे नायब तहसिलदार यांच्याशी मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र 13 फेब्रुवारीपासून रुचि सिंह ड्यूटीवर हजर झाली नव्हती. पोलीस स्थानकातील तिच्या महिला सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र यात यश आले नाही. रुचि सिंह हिचा फोन स्विच ऑफ येत होता. यानंतर पोलिसांनी रुचि सिंह बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतली.
पोलीस तपासादरम्यान काली माता नावाच्या भागात गटारीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. याची माहिती पीजीआय पोलीस स्थानकाने सुशांत गोल्फ स्थानकाला दिली. यानंतर रुचि सिंह हिच्यासोबत काम करणाऱ्या महिला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली. सदर मृतदेह रुचि सिंह हिचाच असल्याचे उघड झाले. यानंतर बिजनौरमध्ये राहणाऱ्या तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली.
प्रेम प्रकरणातून हत्याकांड की आत्महत्या?
रुचि सिंह हिचे नायब तहसिलदाराशी प्रेमसंबंध होते. रुचि सिंह आणि नायब तहसिलदार दोघेही विवाहित होते. रुचिचा पती पोलीस कॉन्स्टेबल असून तो कुशीनगर पोलीस स्थानाकात तैनात आहे. लग्न झालेले असतानाी रुचि हिचे प्रतापगडच्या राजीगंजमधील नायब तहसिलदाराशी संबंध होते आणि दोघांची मैत्री फेसबुकद्वारे झाली होती. पाच वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. रुचि सिंह नायब तहसिलदाराकडे सातत्याने लग्नासाठी दबाव टाकत होती, अशीही माहिती समोर आली आहे.
नायब तहसिलदार ताब्यात
दरम्यान, पोलिसांनी नायब तहसिलदाराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.


























































