‘मिशन बिगिन अगेन फेज-2’, मुंबईत आजपासून दुकाने सुरू

1549
प्रातिनिधिक फोटो

सरकारच्या निर्देशानुसार लॉकडाऊन टप्प्याटप्याने खुले करण्यासाठी सुरू केलेले ‘मिशन बिगिन अगेन फेज – 2’ शुक्रवार 5 जूनपासून सुरू होत असल्याने मुंबईत उद्यापासून दुकाने, मार्केट, मंडया सुरू होणार आहेत. एक दिवसाआड ही दुकाने सुरू राहणार असून रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी खुली राहतील तर डाव्या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उघडली जाणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहतील.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही 24 मार्चपासून म्हणजेज गेल्या सुमारे अडीच महिन्यापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. मात्र कोरोना नियंत्रणात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन खुले करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरू होणार्‍या ‘मिशन बिगिन अगेन’ची घोषणा केली होती. यानुसार मुंबईतील अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक काढून नव्या गाइडलाइन जारी केल्या आहेत.

यानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच दुकाने खुली राहणार आहेत. यामध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळणे अनिवार्य असेल. यासाठी दुकानदारांनी लाइनमध्ये अंतरासाठी मार्किंग करावे, गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना टोकन देण्याची व्यवस्था करावी असे नियम पाळावे लागणार आहे. हे नियम पाळत नसल्यास संबंधित दुकान, मार्वेâट तातडीने बंद करण्यात येणार आहे. याशिवाय ट्रायल, रिटर्न आणि एक्सेंजवर बंदी राहणार असल्याचे नव्या नियमात नमूद करण्यात आले आहे. उद्यापासून दुकाने उघडली जाणार असली तरी मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

कंटेनमेंट झोनमध्ये ‘शटर डाऊन’च
गर्दी, धोका टाळण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. या ठिकाणी मेडिकल, इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवाच सुरू असतील. याशिवाय रविवारीही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच राहतील. नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित वॉर्डच्या सहायक आयुक्तांवर असेल.

फक्त अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी वाहतूक
शुक्रवारपासून सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नसली तरी अत्यावश्यक सेवा-कारणांसाठी टॅक्सी-कॅब सुरू करण्यास परवानगी असेल. यामध्ये ड्रायव्हर आणि फक्त दोनच प्रवासी असतील.

याशिवाय रिक्षा, चारचाकी गाड्या यांचा अत्यावश्यक कारणांसाठीच वापर करता येईल. यामध्ये ड्रायव्हर आणि दोनच प्रवासी घेण्यास परवानगी राहील. तर अत्यावश्यक कारणासाठीच दुचाकी वापरता येईल. मात्र डबलसीट घेता येणार नाही.

घरोघरी वृत्तपत्रे 7 जून तर खासगी कार्यालये 8 जूनपासून
मिशन बिगिन अगेन अंतर्गत पहिल्या टप्प्यात 3 जूनपासून सोशल डिस्टंन्स पाळून जॉगिंग, सायकलिंग, वॉकिंग, व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात दुकाने सुरू होत आहेत. तर तिसर्‍या टप्प्यात कर्मचार्‍यांची 10 टक्के उपस्थिती ठेवून खासगी कार्यालये सुरू करता येणार आहेत. शिवाय 7 जूनपासून आवश्यक खबरदारी घेऊन घरोघरी वृत्तपत्रे वाटप सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या