आवड आम्हा चंद्राची चंद्राची हो!!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी

आपली चांद्रयान मोहीम 2. विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर ही सगळी शास्त्रीय नावे एका रात्रीत सामान्यांच्या तोंडी रुळली आणि याकडे जगासोबत आपल्या देशातील अतिसामान्य माणसाचेही लक्ष वेधले… याचे सारे श्रेय जाते इस्रो व त्याचे अध्यक्ष के. सिवन यांना….

तो चमचमत्या चंदेरी स्वप्नांपासून बनलेला आहे. पुराणकाळापासून ही स्वप्नं त्याच्याभोवती रुंजी घालत आहेत ती आजतागायत. नितांत देखणा, वाटोळा, गुबगुबीत चांदोबा. त्याचे असणेच आपल्या जगण्याशी अनेक महत्त्वाच्या घटनांतून जोडलेले. आई-आजीच्या गोष्टींतून, अंगाईगीतांतून हळूच डोकावणारा तो शाळेत सहजच भूगोलाचा पाठ होतो. अमावस्या, पैर्णिमा, भरती-ओहोटी अशा अवघड अभ्यासात तो उगीच परका होतो आणि संकष्टीला, बाप्पांच्या मजेशीर कथांमधून पुन्हा हवाहवासा, आपलासा वाटू लागतो. हा चांदोबा आपला लहानपणापासूनचा सोबती. अगदी प्रवासातही तो आपल्या गाडीसोबत आकाशातून हलकेच धावत असतो. कधी रात्री दिसतो तर कधी पहाटेच्या लालस आकाशात हसत असतो.. या चांदोबाचा मोह खुद्द श्रीरामालाही आवरता आला नाही. त्यालाही तो हातात खेळायला हवा होता. आपल्यापैकी प्रत्येकजणच त्याच्याशी जवळीक साधतो. कथा-कवितांमधून, आवडत्या बाप्पाच्या संकष्टीमधून. या न त्या मार्गाने चांदोबा प्रत्येकालाच हवा असतो.

पण काहीजणांची स्वप्नं फार वास्तववादी असतात. कथेतील. कल्पनेतील प्रत्येक गोष्ट ही माणसे सत्यात उतरवू पाहतात. विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा ठाशीव कस लावून. हिंदुस्थानी अंतराळ संस्था, अर्थात इस्रो. या आपल्या इस्रोमध्ये अनेक स्वप्नवत वाटणाऱया गोष्टी सत्यात उतरतात. किंबहुना या गोष्टी सत्यात उतरवण्याचा जणू येथील शास्त्रज्ञांनी वसाच घेतला आहे. डॉ. विक्रम साराभाईंपासून, डॉ. अब्दुल कलामांपासून अंतराळाची ही स्वप्नवत दुनिया सामान्य माणसाजवळ आणण्याचा चंगच बांधला आणि सामान्यांनाही वास्तववादी, विज्ञाननिष्ठ स्वप्ने पाहण्यास शिकविले. यातूनच इस्रोचा प्रत्येक शास्त्रज्ञ स्वप्नं आणि सत्य याचा सहजसुंदर मेळ घालतो. चिवट जिद्दीनं, अंतराळातील कौतुकाला, कुतुहलाला विज्ञानाच्या कसोटीवर पारखून समाजाच्या हितासाठी पृथ्वीवर उतरवण्याच्या प्रयत्नात असतो.

चांद्रयान 2. इस्रोची अत्यंत आव्हानात्मक आणि सगळ्या जगासाठी कुतुहलाचा विषय ठरलेली चांद्रमोहीम. 7 सप्टेंबरच्या पहाटे प्रत्येक हिंदुस्थानी अवकाशात लक्ष ठेवून होता. कोणत्याही देशाने न केलेली मोहीम इस्रोने हातात घेतली आणि अगदी थोडक्यात दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी सगळ्या हिंदुस्थानींचा ठोका चुकला. इस्रोचे समस्त वैज्ञानिक अगदी खुद्द अध्यक्ष के. सिवनही काही क्षण स्वतःच्या भावना आवरू शकले नाहीत. चांद्रयानातील लँडरचा, विक्रमचा संपर्क इस्रोशी तुटला. पण विज्ञानात अपयश कधीच नसते.. असतात ते फक्त प्रयोग. ही खूणगाठ मनाशी बांधून प्रत्येकजणच पुन्हा नव्या जिद्दीने कामाला लागला. हा लेख लिहीत असताना मिळालेल्या ताज्या माहितीनुसार विक्रमचा शोध घेण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले आणि आता लक्ष्य आहे ते विक्रमशी संपर्क प्रस्थापित करणे.

या बाबतीत के. सिवन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिशय सविस्तर माहिती दिली. आमचा आत्मविश्वास आता अधिक दुणावला आहे. कारण आमची चांद्रयान मोहीम 95 टक्के यशस्वी झाली आहे. येत्या काही दिवसांत विक्रमशी संपर्क करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू. या मोहिमेचे, किंबहुना इस्रोच्या प्रत्येक मोहिमेचे उद्दिष्टच मुळी आपल्या देशाचे, समाजाचे हीत आणि समाज अधिकाधिक विज्ञानाच्या जवळ जावा हे आहे. समाजाच्या भल्यासाठी उपयोगी ठरेल असा सॅटेलाईट मला विकसित करायचा आहे. सिवन यांनी अत्यंत ठामपणे सांगितले. इस्रोचे अध्यक्षपद भूषविणारे के सिवन. अर्थात कैलासवाडिवु सिवन. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील हा मुलगा आज चांद्रयान मोहिमेचा नायक बनला आहे. स्वतः सिवन सर रॉकेटमॅन म्हणून ओळखले जातात. आपल्या देशाच्या विकासासाठी इस्रोने अनेक मोहिमा ठरविल्या आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत.

येथे सिवन सर सांगतात की, केवळ संपन्न देशाशी स्पर्धा म्हणून मोहिमा आखणे हा इस्रोचा हेतू कधीच नाही. आपल्या अंतराळ मोहिमेचे वैशिष्टय़ म्हणजे आपली कोणतीही मोहीम युद्धामुळे सुरू झालेली नाही. अमेरिका, युरोप, रशिया यांचे अंतराळ संशोधन शीतयुद्धामुळे सुरू झाले होते पण आजपर्यंत जे कोणीही केले नाही तिथे शोध घेऊन माहिती मिळविणे, माणसाच्या उगमाचा आणि विकासाचा अर्थ त्याच्याशी लावणे हा हेतू इस्रोच्या विज्ञान आणि अंतराळ संशोधनामागे आहे. आज इस्रोमुळे आपल्या देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान पोहोचते आहे.

सिवन सर पुढे म्हणाले की, सर्वसाधारणपणे विज्ञान प्रसाराचे काम एकांतात आणि लोकांच्या दृष्टीआड केले जाते, पण आपल्या देशातील वैज्ञानिक काय करत आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार देशातील प्रत्येकाला आहे आणि गरज पडल्यास जनता वैज्ञानिकांना समाजाच्या अडचणी सोडविण्याचे आदेशही देऊ शकते. आज चांद्रयान मोहीम पूर्ण झाली तर ते हिंदुस्थानी वैज्ञानिकांचे प्रगतिपुस्तक मानले जाईल. इस्रोच्या संशोधनासाठी चंद्रावरील दक्षिण ध्रुव निवडण्यामागे दोन कारणे आहेत. संशोधनाअंती आपल्याला हे समजेल की, तेथील जमीन आणि माती पृथ्वीशी साधर्म्य राखणारी आहे का? येथे आपल्याला एक जरी पाण्याचा साठा मिळाला तरी मानवाला चंद्रावर जाण्यासाठी मार्ग खुला झालेला असेल. चांद्रयान मोहीम 2 हा एका बदलाचा स्पष्ट संकेत आहे. आतापर्यंत इस्रो विज्ञान तंत्रज्ञानात निष्णात होण्यावर भर देत होते. पण या मोहिमेनंतर इस्रो आपल्या चार भिंतींबाहेर पडून महाविद्यालयांनाही त्यात सामील करून घेईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या मोहिमा या सामान्य जनतेच्या पैशाच्या मदतीने पार पाडल्या जातात. म्हणूनच मग हा पैसा समाजोपयोगी ठरावा हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. ज्याच्याबद्दल आपण कधीही विचार केला नाही,अशी नवी क्षितिजे गाठण्यासाठी चांद्रयान-2 प्रेरित करेल. चंद्र किंवा मंगळावर पहिली मनुष्यवस्ती हिंदुस्थानामध्ये स्थापन करण्याचे स्वप्न आपण साकार करू.

आज हिंदुस्थानने अंतराळ संशोधनात मोठय़ा प्रमाणात यश कमावले आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रात सर्वाधिक उपग्रह आपल्याकडे आहेत.
इस्रोने इतर देशांप्रमाणे अंतराळ परीक्षणासाठी प्राणी न पाठविता रोबो पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
2021 पर्यंत अंतराळात मानव पाठवण्याच्या मोहिमेवर इस्रोचे काम सुरू आहे. येथेही रोबोचीच मदत घेतली जाणार आहे.
चांद्रयान मोहिमेनंतरची गगनयान मोहीम हे इस्रोचे लक्ष्य आहे. ते पूर्ण झाले तर अंतराळात मानव पाठवणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरेल.

इस्रोच्या प्रत्येक मोहिमेचे वैशिष्टय़ म्हणजे त्यामधील महिला शास्त्रज्ञांचा सहभाग. येथे सिवन सर अभिमानाने सांगतात की, आम्ही महिला आणि पुरुष असा भेदभाव करीत नाही. इस्रोमध्ये 30 टक्के महिला वैज्ञानिक काम करतात. चांद्रयान -2 च्या मिशन डायरेक्टर रितू करीधल यांना रॉकेट वुमेन म्हटले जाते तर एम. वनिता या मोहिमेत प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. वनिता यांनी अनेक वर्षे अनेक उपग्रहांवर काम केले आहे.

ही मोहीम यशस्वी होईल यात शंकाच नाही. पण सिवन सर किंवा इस्रोच्या प्रत्येक वैज्ञानिकाकडून घेण्यासारखी आहे ती त्यांची चिवट जिद्द आणि जबर इच्छाशक्ती. या दोन गोष्टींच्या आधारेच आज इस्रो अंतराळासकट खूपच छान पद्धतीने आपल्या संपूर्ण जगण्यातच वावरते आहे.

[email protected]