अक्षयच ‘ब्लॉकबस्टर खिलाडी’, ‘मिशन मंगल’ वर्षातला दुसरा वीकेण्ड ओपनर

1125

अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. गुरुवार ते रविवार या चारच दिवसांत या सिनेमाने तब्बल 97 कोटींची घसघशीत कमाई केली आहे. पाचव्या दिवशीच तो 100 कोटींचा टप्पा पार करेल हे नक्की. यामुळे आजघडीला बॉलीवूडचा ‘ब्लॉकबस्टर खिलाडी’ अक्षयकुमार हाच आहे यात शंका उरलेली नाही. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा वीकेण्ड ओपनर ठरला आहे. याआधी सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटाने पहिल्या वीकेण्डला 150 कोटींचे कलेक्शन केले होते.

गुरुवारी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने 29 कोटी 16 लाख रुपये कमावले. त्यानंतर शुक्रवारी 17 कोटी 28 लाख रुपये, शनिवारी 23 कोटी 58 लाख रुपये आणि रविवारी 27 कोटी 54 लाख रुपयांची कमाई सिनेमाने केली आहे. जगन शक्ती यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

विशेष म्हणजे अक्षयकुमारच्या सलग तिसऱया सिनेमाने पहिल्याच वीकेण्डला घसघशीत कमाई केली आहे. 2018 साली त्याच्या ‘2.0’ या सिनेमाने वीकेण्डला 97 कोटी 25 लाख रुपये मिळवले होते, तर त्यानंतर त्याच्या ‘केसरी’ या सिनेमाने पहिल्या वीकेण्डला 80 कोटी 70 लाख रुपयांची कमाई केली, तर आता ‘मिशन मंगल’ने पहिल्या चार दिवसांत 97 कोटी 58 कोटी मिळवले आहेत. या तीनही चित्रपटांनी पहिल्या पाचच दिवसांत 100 कोटींचा जादुई आकडा पार केला आहे हेही विशेषच म्हटले पाहिजे.

या वर्षातील टॉप-5 वीकेण्ड ओपनर
आतापर्यंत 2019 या वर्षभरात बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेण्डला दणक्यात कमाई करणाऱया केवळ पाचच चित्रपटांची नोंद झाली आहे. यात ‘भारत’ या सलमान खानच्या सिनेमाचा क्रमांक पहिला लागतो. या सिनेमाने पहिल्या वीकेण्डला 150.10 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर त्यापाठोपाठ ‘मिशन मंगल’ दुसऱया क्रमांकावर आहे. त्याने चार दिवसांच्या वीकेण्डमध्ये 97.58 कोटी मिळवले आहेत. त्याखालोखाल अक्षयच्याच ‘केसरी’ या सिनेमाने बाजी मारली असून त्याने पहिल्या वीकेण्डला 78.07 कोटी कमावले, तर पाचव्या क्रमांकावर ‘कबीर सिंह’ या सिनेमाने पहिल्या वीकेण्डला 70.83 कोटी रुपये मिळवण्याची करामत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या