एआयचे 95 टक्के प्रोजेक्ट अयशस्वी, कंपन्यांना विचार करायला लावणारा एमआयटीचा अभ्यास

एआयची एंट्री झाल्यापासून जगभरातील कंपन्यांनी या तंत्रज्ञानाकडे मोर्चा वळवला आहे. जगभरातील कंपन्या एआय तंत्रावर पैसे लावत आहेत. मात्र त्यातून अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. तब्बल 95 टक्के पायलट प्रोजेक्ट यशस्वी झालेले नाहीत. फक्त 5 टक्के प्रोजेक्टने आपले ध्येय गाठण्यात यश मिळवले आहे. यासंदर्भात विचार करायला लावणारा अहवाल एमआयटीने नुकताच सादर केला. एआय तंत्रज्ञान आल्यावर कंपन्यांना वाटलं की त्यांचा महसूल वेगाने वाढेल. मात्र तसे होताना दिसत नाही. कंपन्यांनी एआय प्रणालीचा स्वीकार केला असला तरी जास्त कंपन्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही.

एमआयटी चाचणीत असे दिसून आलंय की, अ‍ॅडव्हान्स एआय मॉडेल्स फक्त 30 टक्केच ऑफिस काम हाताळू शकतात. त्यापुढील काम माणसालाच करायचे आहे. मात्र वैयक्तिक पातळीवर एआय टुल्सचा लोकांना नक्कीच फायदा होईल.

यामागची कारणे काय?

अवास्तव अपेक्षा, खराब इंटिग्रेशन आणि स्पेश अ‍ॅडोप्शनची कमी अशी यामागील काही कारणे आहेत. चॅटजीपीटी, जेमिनीसारखे एआय टुल्स कामाच्या पद्धती बदलतील, असे गेल्या अनेक वर्षांपासून बोलले जातेय. ऑटोमेटेड कंटेंट क्रिएशनपासून कस्टमर सर्व्हिस चॅटबॉटपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात एआयची ताकद दिसेल असा अंदाज होता. एआयमुळे खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल, वगैरे बोलले जात आहेत. एमआयटीच्या अभ्यासातून मात्र हे सारे अंदाज फोल ठरल्याचे दिसून येतंय. एआयचा फुगा फुटला का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.

एमआयटीच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे की, आस्थापनांचा विचार केला तर एआय अ‍ॅडॉप्शन अयशस्वी होण्याचे कारण म्हणजे लर्निंग गॅप. कंपन्या वेगाने एआय टुल्स लागू करत आहेत. मात्र आपल्या गरजेप्रमाणे त्यांनी टुल्स बनवलेले नाहीत. त्यामुळे कंपन्यांच्या पायलट प्रोजेक्टना अपयश येत आहे.