मिठी नदी प्रदूषणमुक्त होणार!

368

एकेकाळी मुंबईचे वैभव असलेली मिठी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यातून सुटून मोकळा श्वास घेणार आहे. नदीच्या शुद्धीकरणासाठी पालिका प्रवाहात येणारे सांडपाणी, मलप्रवाह रोखणार असून नदीलगत सर्व्हिस रोडही बांधण्यात येणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

मिठी नदीच्या प्रदूषणाचा भार दिवसेंदिवस वाढत जात असून रहिवासी व औद्योगिक कंपन्या, विविध नाल्यांमधून जवळपास दशलक्ष लिटर सांडपाणी नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पात्राचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर प्रदूषित नदीचे पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱया चार टप्प्यांतील कामात मिठी नदीमध्ये येणारा मल प्रवाह वळवण्यासाठी नदीलगत प्रवाहरोधक बांधणे, मलवाहिन्या टाकणे, मलजल उदंचन केंद्र व मल प्रक्रिया पेंद्र उभारणे, मिठी नदी सर्व्हिस रोड बांधणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत.

म्हणूनच घेतला निर्णय

26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीनंतर मिठी नदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या अतिवृष्टीत रस्ता, रेल्वे, वायुमार्ग, दूरसंचार व विद्युत सेवा विस्कळीत झाल्याने जनजीवन ठप्प झाले. मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आणि मुंबई शहर तीन दिवस ठप्प झाले. यानंतर नेमलेल्या ‘फॅक्ट फायिंडिंग कमिटी’ने दिलेल्या अहवालानुसार या स्थितीला मिठी नदीचा महापूरही या प्रकाराला कारणीभूत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मिठी नदीच्या सौंदर्यीकरणाबरोबरच प्रदूषण रोखणे, प्रवाहात येणारे सांडपाणी रोखणे, अतिक्रमण रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिठी नदीची वैशिष्टय़े

  • मिठी नदीची एकूण लांबी 17.84 कि.मी
  • एकूण पाणलोट क्षेत्र 7295 हेक्टर
  • पालिकेच्या ताब्यातील मिठी नदी 11.84 कि.मी
  • एमएमआरडीएच्या ताब्यातील मिठी 6.00 कि.मी
आपली प्रतिक्रिया द्या