
बॅडमिंटन गुरुकुल आयोजित बॉम्बे जिमखान्यामध्ये सुरू असलेल्या जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर–क्लब बॅडमिंटन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू अपर्णा पोपट हिला संमिश्र यश मिळाले. महिला दुहेरीत अंतिम फेरी गाठली, पण युनि दुहेरीमध्ये तिला उपांत्य फेरीत तिला पराभव पत्करावा लागला.
अपर्णा आणि नाहीद दिवेचा या अव्वल मानांकित जोडीने अनघा देशमुख आणि स्मिता साळगावकर जोडीने 21-14, 21-2 असा पराभव करत 75 वर्षांवरील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र युनि डबल्सच्या उपांत्य फेरीमध्ये अपर्णा आणि नवल बीर कुमार जोडीला दुसऱया मानांकित राजेश डिसूझा आणि बिभाष चॅटर्जी जोडीकडून 16-21, 13-21 अशी मात खावी लागली.
मंगरीश पालेकरने दोन गटांच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. 85 वर्षांवरील पुरुष एकेरीमध्ये त्याचा सामना नायजेल डिसूझा या आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूशी होईल. दुहेरीच्या उपांत्य फेरीत पालेकर आणि दीपक जेटली या अव्वल मानांकितांनी सिद्धार्थ गुप्ता आणि सुशांत शेट्टी यांचा 21-9, 21-10 तर दुसऱया मानांकित डीसा आणि रोहन राधाकृष्णन जोडीने कार्तिक शाह आणि मौलिक जसपारा यांचा 25-23, 21-19 असा पराभव केला. पालेकरने विक्रांतसोबत 45 वर्षांवरील पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली.


























































