शिंदेंना ई-मेलवरून व्हिप बजावला, विधानसभा अध्यक्षांसमोर सुनील प्रभू यांनी पुरावाच सादर केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी ई-मेलद्वारे व्हीप बजावला होता, असे नमूद करत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी त्या ई-मेलची प्रतच आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणीवेळी सादर केली.

आजच्या संपूर्ण दिवसातील सुनावणी ही एकनाथ शिंदे यांना 22 जून रोजी पाठवलेल्या व्हिपभोवती फिरत होती. तुम्ही हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे का आणि त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत सांगितला का असा प्रश्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उलटतपासणीत केला. त्यावर हो, तो व्हिप एकनाथ शिंदे यांना उद्देशून आहे त्याचा मजकूर मला मराठीत समजावून सांगण्यात आला, असे प्रभू यांनी सांगितले. हे पत्र एकनाथ शिंदे यांना लिहिले मग इंग्रजीत का लिहिले, या प्रश्नावर भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून इंग्रजीत लिहिल्याचे सुनील प्रभू म्हणाले. यासंदर्भात कायदेशीर पेच उद्भवू शकतो असे का वाटले, असे विचारले असता त्यावेळी राजकीय पेच निर्माण झाला होता म्हणून भविष्यात कायदेशीर पेच उद्भवू शकतो असे वाटल्याचे प्रभूंनी नमूद केले.

मी खरे तेच सांगितले

22 जून 2022 रोजीचा व्हिप एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिला हा एक दीड वर्षांपूर्वीचा तपशील मला आठवण नाही, पण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिला असावा असे प्रभू म्हणाले. त्यावर त्याचा पुरावा जेठमलानी यांनी मागितला. दरम्यान, लंच ब्रेकनंतर कामकाज सुरू होताच प्रभू यांनी 22 जूनला ई-मेलद्वारे व्हिप पाठवला होता, असे स्पष्ट केले. त्यावर कोणत्या ई-मेल आयडीवरून पत्र पाठवले, कोणी पाठवले, हे पत्र ई-मेलद्वारे  पाठवल्याचे तुम्हाला कसे कळले, तुम्ही सुरुवातीला व्हॉटसअॅपवरून पत्र पाठवल्याचे का सांगितले असे अनेक प्रश्न जेठमलानी यांनी विचारले तेव्हा सगळा तपशीलच प्रभू यांनी दिला. तो व्हिप ई-मेलद्वारे पाठवल्याची माहिती आताच मी ऑफिसमध्ये जाऊन घेतली. मी यामध्ये काहीही लपवलेले नाही. खरे ते सांगितले आहे, असे नमूद करत एकनाथ शिंदे यांना 22 जून रोजी पाठवलेल्या ई-मेलची प्रतच प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर केली.

हे खोटे आहे

शिवसेना-भाजपची युती हितासाठी, नैतिक आणि तात्विक फायद्यासाठी होती, असे शिंदे गटाच्या आमदारांचे म्हणणे होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती बेकायदेशीर, मतदारांचा विश्वासघात करणारी होती, असे असे आमदारांचे म्हणणे होते, असा युक्तिवाद महेश जेठमलांनी यांनी केला. त्यावर हे खोटे असल्याचे सुनील प्रभू म्हणाले.

संघटनात्मक पदाबाबतचा दावा फेटाळला

एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांना शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काढून टाकण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नव्हता, असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला त्यावर हे खोटे असल्याचे प्रभू म्हणाले.

युतीचे ते दिवस चांगले होते…

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात तुमचा निवडणूक प्रचार केला होता. महेश जेठमलानी झिंदाबादच्या घोषणा होत्या अशी आठवण सुनील प्रभू यांनी उलटतपासणीत सांगताच शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी हे सुद्धा तेव्हाच्या निवडणूक प्रचाराच्या आठवणीत काही क्षणासाठी रमले. निवडणुकीपूर्वीचे शिवसेना-भाजप युतीचे ते दिवस चांगले होते असे ते बोलून गेले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी प्रचार केला होता, असे जेठमलानी म्हणाले. सुनावणीला शिवसेना नेते अनिल परब उपस्थित होते. त्यांच्याकडे बोट दाखवत अनिल परब तुमचे प्रचारप्रमुख होते, अशी आठवणही जेठमलानी यांना प्रभू यांनी करून दिली. तिथे शिवसेना नेते अनिल देसाईही होते. देसाई माझे राज्यासभेतील सहकारी आहेत, असे जेठमलानी म्हणाले.