ज्येष्ठ आमदार लुईझीन फालेरो यांचा काँग्रेसला रामराम; तृणमूल काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार लुईझीन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे गोव्यात काँग्रेसचे संख्याबळ पाच वरुन चार झाले आहे. फालेरो यांनी सकाळी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत योग्य वेळी माहिती देतो, असे त्यांनी सांगितले.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते तृणमूल पक्षामध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, या परिषदेत तृणमूल काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. आपण काँग्रेस पक्ष सोडलेला असला तरी आपले विचार काँग्रेसचे आहेत, असे सांगत त्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. तसेच तृणमूल काँग्रेसमध्ये केव्हा प्रवेश करणार याचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. यावेळी फालेरो यांच्यासोबत काँग्रेसला रामराम केलेले प्रदेश सरचिटणीस यतीश नाईक, विजय पै, आनंद नाईक आदी उपस्थित होते.

आपण निवडणूक लढवणार की नाही किंवा कुठल्या पक्षात दाखल होणार, ते लवकरच तुम्हांला सांगू असे सांगत फालेरो यांनी वेळ मारून नेली. 2017 च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसकडे 21 आमदारांचे पाठबळ होतं. आपण त्या वेळी काँग्रेसच्या दिल्लीतील कायदा विभागाला विचारणा केल्यानंतर राज्यपालांना पत्र देण्याचे सांगितले. आपण पत्रही तयार केले होते. मात्र, गोव्याची जबाबदारी असलेल्या काँग्रेसच्या निरीक्षकांनी आपणास राज्यपालांना पत्र देण्यापासून रोखले होते, असे फालेरो यांनी सांगितले. हे सांगण्यात साडेचार वर्षे का लागली? या प्रश्नाला मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपण कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला त्याच बरोबर गोव्याला राज्याचा दर्जा मिळून दिल्याचेही त्यांनी सांगितले.