नारायण राणे आणि त्यांच्या पिलावळीने उद्धव ठाकरे यांना अडविण्याची भाषा करू नये, जशास तसे उत्तर देऊ – राजन साळवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 मे ला बारसूत येणारच. नारायण राणे आणि त्यांच्या पिलावळीने त्यांना अडविण्याची भाषा करू नये अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसूत येऊन दाखवावे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्या वक्तव्याचा राजन साळवी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राजन साळवी म्हणाले की, नारायण राणे यांना जो काही मानसन्मान मिळाला,वैभव मिळाले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. त्यामुळे नारायण राणे आणि त्यांच्या पिलावळीने आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडविण्याची भाषा करू नये. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसूला येणारच. नारायण राणे आणि त्यांच्या पिलावळीने त्यांना अडविण्याची भाषा केली तर आम्ही शिवसैनिक जशास तसे उत्तर देऊ असा इशारा उपनेते आमदार राजन साळवी यांनी दिला आहे.

पुढे साळवी म्हणाले की, अणुउर्जा प्रकल्पाच्या वेळी नारायण राणे यांनी माझ्यावर बेताल आरोप केले होते. अणुउर्जा प्रकल्पात माझी जागा आहे. माझा ठेका असल्याचा आरोप केला होता त्याचवेळी मी आव्हान दिले होते की, जर माझी जागा किंवा ठेका असेल तर ते राणेंनी सिध्द करावे मी राजकीय संन्यास घेईन आणि जर सिध्द करू शकले नाहीत तर राणेंनी राजकीय संन्यास घ्यावा असे आव्हान मी दिले होते. ते ही काही सिद्ध करू शकले नाहीत.

पक्षप्रमुख देतील तो आदेश मान्य
रिफायनरी प्रकल्पाबाबत आपली भूमिका काय आहे? हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उपनेते आमदार राजन साळवी म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो मान्य असेल.