छगन भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचण्यात दंग, स्क्रिनशॉट शेअर करत रोहित पवारांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणाऱ्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आता शाब्दिक चकमकी सुरू आहेत. सत्तेतील अजित पवार गटाकडून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर निशाणा साधला जात आहे. अजित पवारांनंतर छगन भुजबळ यांनीही रोहित पवारांवर टीका केली. याला रोहित पवार यांनी उत्तर दिले असून छगन भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचण्यात दंग असल्याचा हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. छगन भुजबळ यांनी ज्या युट्यूबरचा दाखला देत रोहित पवार यांच्यावर हल्ला केला होता त्याच युट्यूबरने भुजबळ सत्तेत नव्हते तेव्हा त्यांच्यावरही जहरी टीका केली होती. याचेच हे स्क्रिनशॉट आहेत. याचा दाखला देत रोहित पवार यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

#युवा_संघर्ष_यात्रा युवांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन चालत असल्याने संघर्ष यात्रेला कुठेही विरोध झाला नाही. आपण भाजपची स्क्रिप्ट वाचण्यात इतके दंग झालात की भाजप ट्रोल आर्मीचा भाग असलेल्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत खास असलेल्या एका युट्यूबरचा आपण दाखला देऊन माझ्यावर टीका केली. आपण ज्या घटनेचा उल्लेख केला, त्या घटनेबद्दल मी पंधरा दिवसांपूर्वीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळं मी पुन्हा स्पष्टीकरण देऊन आपला वेळ घेणार नाही, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले.

आपणास अजून आपल्याला नव्या सहकाऱ्यांचं खरं रूप कळलेलं दिसत नाही. त्यामुळं स्क्रिप्ट वाचताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. याच युट्यूबरने सत्तेत जाण्यापूर्वी आपल्यावरही असेच बदनामी करणारे अनेक व्हिडीओ केले आहेत आणि त्यातील काही स्क्रीन शॉट इथं शेअर करत आहे. आपण ते व्हिडीओ एकदा जरूर बघावेत. त्यानंतर कदाचित आपण भाजपच्या स्क्रिप्ट वाचताना नक्की काळजी घ्याल, हा विश्वास आहे, असा टोलाही रोहित पवार यांनी भुजबळांना लगावला.