बँकेचे व्याज वाचवण्यासाठी कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल – देशमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधीर नागापुरे । माजलगाव

माजलगाव तालुक्यातील तिन्ही साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्यापही या कारखान्यांनी उसाचे पैसे दिले नसून त्यांची टोलवाटोलवी म्हणजे वेळकाढू धोरण असून त्यातून बँकेचे व्याज वाचवण्यासाठी त्यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, ती तात्काळ थांबवून येत्या सोमवार पर्यंत या कारखान्यांनी पहिला हप्ता द्यावा अशी मागणी आमदार आर. टी. देशमुख यांनी केली.

‘सामना’शी बोलताना देशमुख म्हणाले की, ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने अगोदरच अडचणीत आहे,अशा स्थितीत त्याला लग्न कार्य व स्वतःच्या घरगुती अडचणी, सावकाराचे -बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैशांची चणचण भासत असताना माजलगाव तालुक्यातील सोळंके, छत्रपती, जय महेश या कारखान्यांनी गाळप सुरू होऊन दोन महिने झाले तरी पैसे दिले नाहीत. कोण पहिला हप्ता काढणार अशी स्पर्धा दाखवून दिशाभूल करण्यात येत आहे. वास्तविक पाहता तसे नसून भावाच्या स्पर्धेच्या नावाखाली बँकेचे व्याज वाचवण्याची नवी शक्कल या कारखान्यांनी लढवली आहे.त्यांना शेतकऱ्यांची खरी काळजी असेल तर तात्काळ पहिला हप्ता देऊन अंतिम हप्त्यासाठी त्यांनी भावाची स्पर्धा करून मग त्याचे राजकारण करावे असेही देशमुख म्हणाले.

योगेश्वरी पहिला हप्ता 1800 ने देणार
आमदार आर टी देशमुख यांच्या लिंबा येथील योगेश्वरी साखर कारखान्याने ऊस दराची पहिली कोंडी मराठवाड्यात फोडली असून हा कारखाना पहिला हप्ता 1800 रुपये प्रमाणे 15 जानेवारी पर्यंत बँकेत वर्ग करणार असून या हंगामात योगेश्वरी कारखाना 3 लाख मे टन ऊस गाळपाचे उद्देष्ट पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.