
सामना प्रतिनिधी, नागपूर
मराठवाडय़ातील गंगापूर-खुलताबादचे भाजपा आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर असल्याचा गंभीर आरोप संभाजीनगर व तसेच मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानभवनात प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलताना केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही भाजपा आमदारांचाही समावेश आहे. या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली आहे. आमदार बंब यांनी विविध खात्यातील सुमारे एक हजाराहून अधिक अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींचे पुढे काय झाले, याची कुणालाच माहिती नाही. या तक्रारींमुळे अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतो व मतदारसंघातील विकासकामे खोळंबतात, असा आरोप या आमदारांनी केला आहे. फडणवीस यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रताप पाटील-चिखलीकर (शिवसेना), तानाजी मुटकुळे, मोहन फड (दोघे भाजप) आदी आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांना सांगितले. त्यांच्या तक्रारीमुळे या अधिकाऱयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतो. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील कामे खोळंबली आहेत. कंत्राटदार कामे करायला तयारी नाहीत, असे या आमदारांनी म्हटले. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनीही यासंदर्भात योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिल्याची माहिती या आमदारांनी दिली.
विकासकामांचा पाठपुरावा करणे म्हणजे ब्लॅकमेलिंग होते काय?
आमदार प्रशांत बंब हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांच्या विरोधातच तक्रार आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रशांत बंग यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलताना आपल्यावरील सर्व आरोप धादांत खोटे आहेत. विकासकामांचा पाठपुरावा करणे म्हणजे ब्लॅकमेलिंग होते काय, असा सवाल प्रशांत बंब यांनी उपस्थित केला.






























































