
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोनोरेलच्या सहा गाडय़ांची दुरुस्ती लवकरात लवकर करा नाहीतर मोनोचे दोन्ही टप्पे आम्ही चालवू, असा अल्टिमेटम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्कोमी इंजिनीयरिंग कंपनीला दिल्याची माहिती मिळाली आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला मोनो सुरू झाली पाहिजे असे स्कोमीला बजावण्यात आल्याचे समजते.
चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. मोनो चालवण्याचे कंत्राट स्कोमी इंजिनीयरिंगला देण्यात आले आहे. मुंबईसाठी मोनोच्या दहा गाडय़ा घेण्यात आल्या होत्या. त्यातील चार गाडय़ा पहिल्या टप्प्यावर धावत आहेत. उर्वरित सहा गाडय़ांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याची जबाबदारीही स्कोमी इंजिनीयरिंगची आहे, परंतु अद्याप त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी सांगितले.
सहा गाडय़ांच्या दुरुस्तीसाठी सुटे भाग आणायचे आहेत. त्यासाठी पैसे देण्यात यावेत अशी मागणी एमएमआरडीएकडे करण्यात आली होती, परंतु काहीच प्रतिसाद मिळालेला नाही असा दावा स्कोमी इंजिनीयरिंगमधील सूत्रांनी केला. एमएमआरडीएला ही दुरुस्ती फुकटात करून हवी असल्याचा दावाही त्यांनी केला. स्कोमी इंजिनीयरिंग कंपनी सध्या घाटय़ात असून या कंपनीच्या मलेशियातील कर्मचाऱयांना गेली सहा महिने पगार मिळाला नसल्याचे वृत्त आहे.
एमएमओसीएलच्या स्थापनेनंतर एमएमआरडीएची छाती फुगली
मोनो आणि मेट्रो सध्या कंत्राटावरच चालवली जात आहे. त्याशिवाय एमएमआरडीएकडे पर्याय नव्हता, पण काही दिवसांपूर्वी सरकारने ‘मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमओसीएल) या स्वतंत्र कंपनीची स्थापना केल्याने एमएमआरडीएची छाती फुगली आहे. पुढच्या वर्षी मोनोरेलचा पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे एमएमओसीएलच्या अखत्यारित चालवण्याची तयारीही एमएमआरडीएने केली आहे.






















































