लग्न आणि वाढदिवस समारंभासाठी मोनो मिळणार भाड्याने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2014 साली मुंबईत मोनोरेलची सेवा सुरू झाली. पाच वर्षात मोनोरेल नफ्यात आली नाही. प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने या एमएमआरडीएला प्रकल्पातून मोठे नुकसान होत आहे. आता नफा कमावण्यासाठी एक नवीन शक्कल लढवण्यात आली आहे. मोनोरेल लग्न आणि वाढदिवसाच्या समारंभांसाठी भाड्याने मिळणार आहे. उद्या मोनोरेलमध्ये मंगलाष्टक आणि हॅपी बर्थडे ऐकायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको

दरवर्षी साडेतीन कोटी प्रवासी मोनोरेलचा वापर करतील असा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला होता. परंतु वर्षाकाठी फक्त 41 लाख 87 हजार प्रवाशांनी मोनोरेल सेवेचा फायदा घेतला. मोनोरेलला सध्या दिवसलाअ साडे 8 लाख रुपयांचे नुकसात होत आहे. हे नुकसान भरू काढण्यासाठी आता मोनोरेल व्यावसायिक कारणासाठी खुले करण्यात येणार आहे. सोमवारी एमएमआरडीच्या अधिकार्‍यांची या संदर्भात बैठक पार पडली. त्यात लग्न आणि वाढदिवस समारंभासाठी मोनोरेल भाड्याने देता येईल का या विषयावर चर्चा झाली. गर्दी नसण्याच्या वेळेत मोनोरेल भाड्याने देता येईल त्यामुळे होणारे नुकसान भरून निघेल असे अधिकार्‍यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून मोनोरेलच्या प्रवाशांमध्ये अजून घट झाली आहे. डिसेंबरपूर्वी दिवसाला 15 हजार प्रवासी मोनोरेलचा वापर करायचे. डिसेंबरपासून ही संख्या 10 हजारांवर आली आहे. एमएमआरडीएने फेब्रुवारी महिन्यात 25 हजार प्रवाशांचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच प्रत्येक पाच मिनिटांनी प्रवाशांना मोनोरेल मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.