एमएमआरडीए शोधणार मुंबईच्या पोटातील पाणीसाठे, ईआयएसद्वारे होणार सर्वेक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या पोटात पाण्याचा भरपूर साठा आहे हे सर्वज्ञात आहे. परंतु ठिकठिकाणी विखुरलेल्या या पाणीसाठय़ांची सद्यस्थिती काय आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लवकरच एक सर्वेक्षण करणार आहे. पाणीसाठय़ांचे संरक्षण आणि पाण्याच्या दर्जाची तपासणी हे प्रमुख उद्देश या सर्वेक्षणामागे आहेत.

एमएमआरडीएच्या एनव्हायरनमेंट इप्रुव्हमेंट सोसायटीमार्फत (ईआयएस) हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी ही सोसायटी सल्लागारही नेमणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील पाण्याचे स्रोत या सर्वेक्षणात शोधले जाणार आहेत. त्या पाणीसाठय़ांची सॅटेलाईट छायाचित्रे आणि नकाशे ईआयएसने मिळवले आहेत. मुंबईत सुमारे दोन हजार पाणीसाठे आहेत. पाण्याचा उपसा आणि वापर यानंतर या पाणीसाठय़ांची स्थिती काय आहे त्याची तपासणी या सर्वेक्षणात केली जाईल अशी माहिती ईआयएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पाण्याचा दर्जाही तपासणार
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात ९९४ गावे आहेत. या सर्वेक्षणाचा फायदा या गावकऱयांनाही होणार आहे. कारण सर्वेक्षणादरम्यान पाण्याच्या दर्जाची तपासणीही केली जाणार आहे. एखाद्या ठिकाणचे पाणी प्रदूषित आढळले तर त्याचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने प्रथमच मुंबईतील पाण्याच्या दर्जाची तपासणी होणार असल्याचा दावाही ईआयएसने केला आहे.

पाणीसाठय़ांच्या संरक्षणाचीही योजना
या सर्वेक्षण अहवालातून मिळणाऱ्या माहितीचा वापर करून पाणीसाठय़ांच्या संरक्षणाची योजनाही बनवण्याची ईआयएसची योजना आहे. भूगर्भातील पाण्याचे किती स्रोत अजून जिवंत आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे हे सर्वेक्षणातून उघड झाल्यानंतर त्या स्रोतांचे संरक्षण करण्याची योजना बनवणे सुलभ होणार आहे.