‘मनसे’चा नवा झेंडा नवा अजेंडा, आता हिंदुत्वाचा पुरस्कार

1551

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचे धोरण अवलंबले असून पक्षाने गुरुवारी आपला झेंडा बदलला. ‘मनसे’च्या झेंडय़ावर याआधी भगवा, निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश होता. नव्या झेंडय़ावर भगवा रंग आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

‘मनसे’चे पहिले महाअधिवेशन गोरेगावच्या नेस्को संकुलात पार पडले. या वेळी अधिवेशनाला मार्गदर्शन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा हाच झेंडा असावा असे सुरुवातीपासून मनात होते असे सांगितले. शिवाय मनसेने सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दिला असून 9 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणाही राज ठाकरे यांनी केली. कोणत्याही निवडणुकीत नव्या झेंडय़ाचा वापर करायचा नाही. त्या वेळी मनसेची निशाणी असलेला झेंडाच वापरायचा असे सांगून राज ठाकरे यांनी मनसेबाबत कोणतीही गोष्ट फेसबुक, ट्विटरवर टाकली तर पदावरून काढून टाकेन असा इशारा पदाधिकाऱयांना दिला.

अमित ठाकरे नेतेपदी

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून अधिवेशनात या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. या वेळी अमित ठाकरे यांचा नियुक्तीबद्दल सत्कारही करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या