ईद असल्याने महाआरतीच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंकडून स्थगिती, मनसे कार्यकर्त्यांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी रमझान ईद आहे. कोणत्याही सणात व्यत्यय नको म्हणून राज्यभरातील महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच!’, असं राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटलं आहे.

महाराष्ट्रात 3 मे रोजी महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आता हे आयोजन रद्द करण्यात आले आहे. याला मुख्यकारण म्हणजे 3 तारखेला रमझान ईद आहे. त्यात आम्हाला ढवळाढवळ करायची नाही. त्यांचा सण कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडावा म्हणून असा निर्णय घेण्यात आला, असे मनसेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.