गद्दारांची टोळी गद्दारांनाच गोळा करत फिरतेय, मिंध्यांमुळे राज्याला गद्दारीचा शाप; मनसेचे राजू पाटील यांचा हल्ला

50 खोके घेऊन मिंधे फुटले. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला आहे. आता गद्दारांची टोळी दुसऱ्या पक्षातल्या गद्दारांनाच गोळा करत फिरत असल्याचा हल्लाबोल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या दोन माजी नगरसेवकांची मिंधेंनी फोडाफोडी केली. त्याचा समाचार राजू पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. 50 खोके घेऊन हे फुटले. आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राजू पाटील यांनी ‘एक्स’ पोस्टवरून दिला आहे.