राहुल गांधी यांच्यावर ‘लेसर’नाही तर मोबाईलचा लाइट; एसपीजीचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अमेठी येथे उमेदवारी दाखल करताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर लेसर गनने निशाणा साधण्यात आला होता असा आरोप करत काँग्रेसने गृहखात्याकडे तक्रार केली आहे, मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीने तो मोबाईलचा लाइट असल्याचा खुलासा केला आहे, तर दुसरीकडे गृहखात्याने अशी कोणतीही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल रोड शो काढून अमेठी मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली. राहुल गांधी यांच्या रोड शोला तुफान गर्दी झाली होती. याच गर्दीतून राहुल गांधी यांच्यावर लेसर गनने निशाणा साधण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक हिरवा ठिपका दिसत असून त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता.