
भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये मोबाईल नेटवर्कची बोंब आहे. मोबाईल नेटवर्क सुरू करण्याबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) आणि दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मेट्रो स्थानकांतील पायाभूत सुविधांशी जोडणी करण्यासाठी ‘एसीईएस इंडिया’ या त्रयस्थ कंपनीकडून दूरसंचार कंपन्यांना अवाजवी दर आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. या तिढ्याचा तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म असल्याने नियमित प्रवाशांची नेटवर्कअभावी मोठी गैरसोय होत आहे.
आरे ते कफ परेडदरम्यान भुयारी मेट्रो सेवा सुरू आहे. वरळी ते कफ परेडपर्यंतचा शेवटचा टप्पा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असतानाही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. मेट्रो मार्गिकेच्या केवळ काही मर्यादित भागांमध्येच व्होडाफोन–आयडिया आणि बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान मोबाईलवरून बाहेरील संपर्क साधणे शक्य होत नाही. आम्ही दररोज तिकिटासाठी ५० ते ७० रुपये मोजतो, तरीही एमएमआरसीएल प्रशासन प्रवाशांसाठी मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करण्यात इतके ढिम्म का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
त्रयस्थ कंपनीला दिलेले कंत्राट ठरत आहे अडसर
एमएमआरसीएलने भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी एका त्रयस्थ कंपनीला कंत्राट दिले आहे. मोबाईल नेटवर्कचा प्रश्न न सुटण्यामागे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. एसीईएस इंडिया ही कंपनी व्यावसायिकदृष्ट्या अवाजवी दर मागत असल्याचा आरोप दूरसंचार कंपन्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात दूरसंचार विभागासह संबंधित कंपन्यांमध्ये अनेकदा बैठका होऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नजीकच्या काळातही भुयारी मेट्रो मार्गिकेतील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सुटण्याची शक्यता धूसर आहे.
मेट्रोच्या २७ अतिरिक्त फेऱ्या
भुयारी मेट्रो मार्गिकेवर सोमवारपासून २७ अतिरिक्त मेट्रो फेऱ्यांची भर पडली आहे. एमएमआरसीएलने सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवसांत नियमित २६५ फेऱ्यांवरून २९२ फेऱ्यांपर्यंत वाढ केली आहे. तसेच शनिवारी एकूण मेट्रो फेऱ्यांची संख्या २०९ वरून २३६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. रविवारी पूर्वीप्रमाणे १९८ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.































































