मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा जेरबंद; पाच लाखांचे मोबाईल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील खेड बाजारपेठेत ओमसाई मोबाईल शॉपी फोडून पाच लाख रूपये किंमतीचे मोबाईल चोरून नेणाऱ्याला रत्नागिरी पोलिसांनी मुंबईत अटक केली. 18 सप्टेंबरला रात्री खेड बाजारपेठेतील ओमसाई मोबाईल शॉपी फोडून 5 लाख 46 हजार 706 रूपये किंमतीचे 41 मोबाईल हँडसेट चोरट्याने चोरले होते. प्रविण लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी अशाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून तपास पथकाला सूचना देत मुंबईला पाठवले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईतील अॅन्टॉप हील येथून संशयित तुषार रामचंद्र गावडे (वय 24 रा.तिसे ता.खेड जि.रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याच्याकडून चेरी केलेले 5 लाख 47 हजार 163 रुपये किंमतीचे 41 मोबाईल हँडसेट, 1 लॅपटॉप व अन्य साहीत्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने गणेश परशुराम गिल्डा यांच्या दुकानातील 36,000 रूपये किंमतीचे 3 एलईडी टी.व्ही.चोरले आहेत.

या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक खेड व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून दोन स्वतंत्र तपास पथकांची नियुक्ती केलेली होती. दोन्ही तपास पथकांकडून आरोपीचा शोध सुरू होता.