मोबाईल चोर ओलाचालकास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य प्रदेशातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाचा कारमध्ये विसरलेला मोबाईल चोरून पसार झालेल्या ओला कारचालकाला पायधुनी पोलिसांनी अटक केली. मोबाईलसाठी फोन केल्यावर त्या चालकाने प्राध्यापक तसेच पोलिसांसोबत अर्वाच्य भाषा करीत मोबाईल देण्यास विरोध केला होता.

नरेंद्रसिंग पटेल (32) हे उज्जेन येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. 14 ते 16 डिसेंबरदरम्यान चर्नी रोड येथील एका खासगी महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते. 13 तारखेला ते विमानाने मुंबईत आले. विमानतळाबाहेर त्यांनी ओला कार बुक केली. कारने पटेल व त्यांची पत्नी मोहम्मद अली रोड येथे आले. त्या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये त्यांनी राहण्याची सोय केली होती. कारमध्ये पटेल यांनी त्यांचा मोबाईल चार्ंजगसाठी लावला होता. कारमधून उतरताना तो मोबाईल घ्यायला नेमके ते विसरले. त्यानंतर त्यांनी काही मेसेज पाहण्यासाठी मोबाईल शोधला असता तो त्यांना मिळून आला नाही. तेव्हा कारमध्ये मोबाईल विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पटेल यांच्या पत्नीने त्या फोनवर कॉल करून मोबाईल देण्याची मागणी केली, मात्र कारचालक शंभू मंडल (39) याने मोबाईल परत देण्यास नकार दिला.

त्यामुळे पटेल दांपत्याने पायधुनी पोलीस ठाण्यात जाऊन मोबाईल चोरीची तक्रार दिली. मग पोलिसांनी देखील शंभूशी संपर्प साधला तेव्हा तो पोलिसांशी देखील अर्वाच्य भाषेत बोलला. त्यानंतर पोलिसांनी मंडलला शोधून काढत चोरीचा मोबाईल हस्तगत केला.