‘आरबीआय’च्या मुख्यालयावर भिरभिरले हेलिकॉप्टर; सुरक्षा, अग्निसुरक्षेसाठी केले मॉकड्रील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयाच्या 25 मजली इमारतीवर हेलिकॉप्टर भिरभिरले. अचानक हेलिकॉप्टरच्या भिरभिरण्याचा आवाज आल्यामुळे दक्षिण मुंबईत बघ्यांची एकच गर्दी झाली. अनेकांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. रहिवासी आणि विविध कॉर्पोरेट ऑफिसांतील कर्मचारी मंडळी गोंधळून गेली. त्यानंतर हे विविध प्रकारची सुरक्षा आणि अग्निसुरक्षेसाठी करण्यात आलेले मॉकड्रील असल्याचे उघड झाले आणि प्रत्येकाचा जीव भांडय़ात पडला.

आरबीआयच्या इमारतीवर यापूर्वी कधीही दिसले नाही असे चित्र होते. हेलिकॉप्टरमधून काही सुरक्षारक्षक धडाधड इमारतीच्या गच्चीवर उतरले. इमारतीच्या एका मजल्यावर काही कर्मचारी अडकून पडले होते. यात अनेक कार्यालयांचाही समावेश होता. इमारतीला अचानक आग लागल्यास कर्मचाऱ्यांना कसे सुखरूप बाहेर काढायचे किंवा एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला कसे तोंड द्यायचे, कर्मचाऱ्यांची सुटका कशी करायची अशा विविध सुरक्षेच्या कारणांचा या मॉकड्रीलमध्ये समावेश होता. दरम्यान, हे मॉकड्रील आरबीआयच्या सुरक्षा विभागातील सुरक्षारक्षकांनी घडवून आणल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यात इतर सुरक्षा संस्थांच्या सुरक्षारक्षकांचाही समावेश होता.

 मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात छाबाड हाऊसमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत अनेक निष्पापांचे बळी घेतले होते. येथील रहिवाशांची सुटका करण्यासाठी कमांडो आणि राष्ट्रीय सुरक्षारक्षकांनी छाबाड हाऊसच्या गच्चीवर उतरून एक ऑपरेशन पार पाडले होते. तशीच परिस्थिती आरबीआयमध्ये निर्माण झाल्यास नेमके काय करावे इत्यादींचा अभ्यास या मॉकड्रीलच्या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.