मोडकसर, तानसा धरण ओव्हरफ्लो; मुंबई, ठाणेकरांना वर्षभर पाण्याचे नो टेन्शन!

tansa-lake-overflowing

मुंबई व ठाणेकरांसाठी गुड न्यूज आहे. मुसळधार पाऊस झाल्याने मोडकसागर व तानसा ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली असून किमान वर्षभर तरी पाण्याचे आता नो टेन्शन! या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला असून पाणीपुरवठा विभागही निश्चित झाला आहे. मोडकसागर व तानसा ही मोठी धरण भरली असली तरी पाण्याचा विनाकारण वापर टाळा.. सेव्ह वॉटर.. असा संदेश देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला. शहापुरातील तानसा व मोडकसागर ही धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. मुंबई, ठाणे शहराला पाणी पुरवणाऱ्या भातसा धरण परिसरातही मुसळधार पाऊस होऊन पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबई महानगर आणि ठाणे शहराला प्रतिदिन दोन हजार दोनशे एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. भातसा धरणात 976.10 दशलक्ष घनमीटर इतक्या जलसंचयाची क्षमता असून 388.50 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आहे.

  • भातसा धरणात 20 जुलैपर्यंत 40 टक्के पाणीसाठा होता. तर गेल्या 10 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे आजपर्यंत 76.80 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
  • मागील वर्षी 30 जुलैला भातसा धरणात 52.94 टक्के पाणीसाठा होता. तर या वर्षी आजच्या दिवशी धरण क्षेत्रात 19.00 मिमी इतका पाऊस झाला.
  • पाणी पातळी 133.50 मीटर झाली असून धरणात एकूण पाणीसाठा 757.582 दलघनमी म्हणजेच एकूण 76.80 टक्के नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाणीकपातीचे टेंशन दूर झाले आहे. आजचा मोडकसागर धरणसाठा 128.925 व तानसा धरणसाठा 143.769 उपलब्ध आहे.

गेल्या वर्षीपेक्षा दमदार

भातसा धरणात मागील वर्षी जुलै अखेरपर्यंतच्या पाणी साठ्यापेक्षा या वर्षीचा आजपर्यंतचा पाणीसाठा अधिक दमदार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत आणखी पाऊस झाल्यास पाणी अतिरिक्त ठरेल. जलसंचय क्षमतेनुसार मुंबईचा वर्षभराचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही सर्वांनी पाणी जपून वापरले तर ते योग्य ठरेल- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, भातसा धरण प्रकल्प.

आपली प्रतिक्रिया द्या