
ऑपरेशन सिंदूरमधील हिरोंना सॅल्युट करतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पह्टो रेल्वे तिकीटांवर छापण्यात आला आहे. याप्रकरणी विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून रेल्वे तिकीटावरून ऑपरेशन सिंदूरच्या आडून मोदी सरकारचा प्रचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेसने मोदींना काही सवालही केले आहेत.
रेल्वेच्या सर्व विभाग आणि झोनमधील रेल्वे तिकीटांवर ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला असून सैन्य दलांच्या यशस्वी मोहीमेचे हे सेलिब्रेशन असल्याचे रेल्वे मंडळाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी दिली. यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. सैन्यदलाच्या शौर्याचा वापर राजकारणासाठी एका प्रोडक्टच्या रुपाने करण्यात येत आहे. केंद्र सरकार जाहीरातजीवी बनले असून हे त्याचे ताजे उदाहरण आहे, असा आरोप मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी केला आहे.
सैन्यदलाचा अवमान करणाऱ्या भाजपनेत्यांच्या पंक्तीला बसले मोदी
भाजप नेते लष्कराचा आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवलेल्या जवानांचा अवमान करत आहेत, त्याच्या पंक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन बसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या जवानांचे फोटो हटवून मोदींना त्यांचा चेहरा तिथे चमकवायचा आहे. कोरोनाकालातही व्हॅक्सीन प्रमाणपत्रावर आपलाच चेहरा त्यांनी चमकवला होता. पुलवामातील शहीद जवानांच्या नावावर भाजपने मते मागितली. बालाकोट हवाई हल्ल्याचा मुद्दा निवडणुकीचा बनवला. सरकारी पेट्रोल पंपांवरही मोदींचेच फोटो लावण्यात आले. आपत्तीला संधीत बदलण्याची कला भाजपाकडून शिकायला हवी, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.