मोघा तलावातील पाणी बेकायदेशीररित्या नदीला सोडले, लाभधारकांचा आत्मदहनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे मोघा तलावात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पाणीसाठ्याच्या भरवशावर मोघा, तीर्थ, किनीकदू, धानोरा व शिंदगी(बु), येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिके व उसाची लागवड केली. परंतु पाटबंधारे खात्याचे इंजिनिअर लोंढे व त्यांच्या वरिष्ठांनी तलावाखालील लाभधारक शेतकऱ्याकडून बेकायदेशीर पैसे खाऊन कॅनलद्वारे पाणी न देता, बेकायदेशीररित्या पाणी नदीत सोडले, असा आरोप करण्यात येत आहे. परिणामी पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असून पाणी साठ्यांचेही नुकसान होत आहे. तरी सदर पाण्याची नासाडी तत्काळ थांबवण्यात यावी. अन्यथा वरील गावचे शेतकरी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी तहसील आवारात सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन वरील गावच्या शेतकऱ्यांनी दिनांक 10 रोजी तहसील व उपविभागीय कार्यालय अहमदपूर यांना दिले आहे.

सदर निवेदनात मोघा, किनीकदू, तीर्थ, धानोरा व शिंदगी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे की, पाटबंधारे खात्याचे इंजिनिअर लोंढे व त्यांच्या वरिष्ठांनी मोघा तलावातून बेकायदेशीररित्या नदीला पाणी सोडले. जुन्या कॅनलचे लोखंडी पाइप वेल्डिंग मशीनद्वारे कापून कॅनलद्वारे पाणी न देता नदीत सोडले आहे. यामुळे पाण्याची नासाडी भयंकर होत असून, पाणी साठा संपत आहे. या पाणी साठ्याच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची पिके व उसाची लागवड केली आहे. भर उन्हाळ्यात पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याच्या नुकसानीमुळे कोणी शेतकरी आत्महत्या केल्यास पाटबंधारे खाते यास जबाबदार राहील. पाण्याची चालू असलेली नासाडी तत्काळ न थांबविल्यास आम्ही शेतकरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सामाईक आत्मदहन करणार असल्याचेही नमूद केले आहे.