
विश्वचषकाच्या अंतिम सामन्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन हिंदुस्थानी संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा फोटो टाकत वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या फोटोमध्ये शमी पंतप्रधानांच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडताना दिसत आहे.
मोहम्मद शामी याने या पोस्टमध्ये “दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण, स्पर्धेत संघाला आणि मला जो पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी सर्व देशाचे आभार मानू इच्छितो. ड्रेसिंग रूममध्ये येऊन आमचा उत्साह वाढवल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार… आम्ही पुन्हा नव्या जोमाने खेळण्यास सज्ज आहोत!” असे लिहिले आहे. यासोबत त्याने पंतप्रधानांच्या खांद्यावर डोक ठेवून भावूक झालेला असतानाचा फोटो टाकला आहे.
क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत, हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना अहमदबादच्या नेरंद्र मोदी स्टेडिअमवर खेळण्यात आला. सामन्या दरम्यान सुमारे 1,00,000 चाहत्यांनी स्टेडिअम भरले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने न्यूझीलंडवर उपांत्य फेरीतील विजयासह सलग 10 सामने जिंकत अंतिम सामन्यात दणदणीत प्रवेश केला होता. मात्र निर्णायक टप्प्यावर पराभव झाल्याने सगळ्यांचे चेहरे पडले होते.
सलग दहा सामने जिंकल्यानंतर क्रिकेटप्रेमींची चषक जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाने 42 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखत सहाव्यांदा विश्वचषक जिंकले.