दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत दक्षिणेचे नेतृत्व अझरुद्दीनकडे

येत्या 4 सप्टेंबरपासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सवर रंगणाऱया दुलीप ट्रॉफी 2025 उपांत्य लढतीत दक्षिण विभागाचे नेतृत्व केरळचा आक्रमक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन करणार आहे. मूळ कर्णधार तिलक वर्मा याची आशिया कपसाठी हिंदुस्थान संघात निवड झाल्याने तो या स्पर्धेत खेळणार नाही.

अझरुद्दीन उपकर्णधार होता, त्यामुळे आता त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याची रिकामी झालेली उपकर्णधाराची जागा तामीळनाडूचा फलंदाज एन. जगदीशन भरणार आहे. दरम्यान, डावखुरा फिरकीपटू आर. साई किशोर अद्याप हाताच्या दुखापतीतून सावरलेला नसल्याने तोही या सामन्यात खेळणार नाही.