खगोलशास्त्रज्ञ अभ्यासक मोहन आपटे यांचे निधन

777

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ अभ्यासक मोहन आपटे यांचे मंगळवारी पहाटे विलेपार्ले येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वहिनी, पुतणी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोहन आपटे यांनी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानविषयक 75 पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये हा खेळ सावल्याचा, कृष्णविवर, गणिताच्या पाऊलखुणा, ब्रम्हांड उत्पत्ती, सूर्यग्रहण, विज्ञान  वेध, डावखुऱयांची दुनिया, गणित शिरोमणी भास्कराचार्य, आकाशगंगा, अग्निनृत्य, अण्वस्त्रांचा मृत्युघोष अशी नावे सांगता येतील. त्यांनी लिहिलेली ‘मला उत्तर हवंय’ ही पुस्तक मालिका बरीच गाजली. सर्व वैज्ञानिक घटनांची सहज सोप्या भाषेत उकल हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्टय़ होय. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यात आपटे यांचे मोठे योगदान आहे.

मोहन आपटे हे संघाचे प्रचारक होते. तसेच त्यांनी विद्यार्थी परिषदेचेही काम पाहिले. उत्तम संघटक, उत्तम वक्ता आणि लेखक म्हणून ते प्रचलित होते. ते मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाचे व्याख्याते होते. त्यांनी भवन्स महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यांनी जनसेवा समिती संस्थेच्या माध्यमातून व्याखानमाला, वक्ता कार्यशाळा, गडकिल्ले भ्रमण-संरक्षण-संवर्धक असे उपक्रम राबवले.

आपली प्रतिक्रिया द्या