भाविकांच्या स्वागतासाठी मोहता देवस्थान सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

बुधवार पासुन सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सव काळात मोहटा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी मोहटा देवस्थान सज्ज झाले असल्याची माहिती श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट चे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी देवस्थान चे विश्वस्त राजेंद्र भंडारी, डॉ. हर्षवर्धन पालवे, रामदास पालवे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, बाळासाहेब क्षीरसागर हे उपस्थित होते. या वेळी बोलताना भिल्लारे म्हणाले, की “नवरात्र उत्सव काळात राज्यासह परराज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वछता गृहाची व सुरक्षिततेची सर्व सुविधा भाविकांना देण्यात येणार असुन उत्सव काळात साठ स्वछता रक्षक चोवीस तास स्वछता दूत चे काम करणार आहेत.” या शिवाय दर्शन बारी रांगेत देवस्थान चे कर्मचारी तसेच एन. सी. सी. एन. एस. एस चे विद्यार्थी व अनिरुद्ध ऍकॅडमीचे स्वयंसेवक भाविकांना सुविधा पुरवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपुर्ण गड परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी एकशे पंधरा कॅमेरे लावण्यात आले असुन त्या द्वारे नेमके कोठे काय चालले आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वॉकिटॉकी यंत्रणा सुध्दा कार्यरत राहणार असुन उत्सव काळात गरोदर, वृद्ध व्यक्तींसाठी स्वतंत्र दर्शनबारी ची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय अपंग भाविकांसाठी तीन वाहनांची सोय करण्यात आली आहे. या शिवाय दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले असुन विखे फाऊंडेशनचे डॉक्टर्स सुध्दा यात्रा काळात भाविकांना आरोग्य सुविधा देणार आहेत.

गडावर उत्सव काळात घटी बसणाऱ्या भाविकांची फराळाची सोय करण्यात आली असुन त्यांच्या साठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. या काळात गडावर भजन, कीर्तन, भारुड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन राजेश दातार व राधा मंगेशकर यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम सुध्दा आयोजित करण्यात आला असल्याचे भिल्लारे यांनी सांगितले.