
‘रोहयो’तून खोदलेल्या विहिरीची बिले काढून देण्यासाठी शेतकऱयाकडे साडेसात हजारांची लाच मागणाऱया तालुक्यातील हिंगणी येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून, त्याच्यावर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश बारगळ असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील हिंगणी येथील तीन शेतकऱयांच्या शेतजमिनीत रोहयोअंतर्गत दोन वर्षांपूर्वी विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने बिल काढण्यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवक बारगळ याची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यावेळी बारगळ याने त्याचे व इतर दोनजणांचे अहवाल तयार करून तो पंचायत समिती कार्यालयात दाखल करून बिल काढण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे सहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराने सहा हजार रुपये नाईलाजास्तव दिले. मात्र, 28 मे रोजी ग्रामसेवक बारगळ याने तक्रारदाराला बिल काढण्यासाठी तिघांचे मिळून साडेसात हजार रुपयांची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावेळी या विभागाने तालुक्यातील लांबोटी येथील हॉटेलमध्ये सापळा लावला.
ग्रामसेवक बारगळ याने तक्रारदाराकडून साडेसात हजार रुपयांची मागणी केली. त्यात तडजोडीअंती 4 हजार 500 रुपये देण्याचे ठरले. त्याचदिवशी तक्रारदाराला घेऊन ग्रामसेवक बारगळ हा लांबोटी येथील एका हॉटेलच्या आवारात दुचाकीवरून येत असताना पाठीमागे एक चारचाकी गाडी येत असल्याने ग्रामसेवक बारगळ याने पैसे न घेता तक्रारदाराला तिथेच सोडून पळून गेला. दरम्यान, तक्रारदाराने त्याला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु 28 मेपासून ते 17 जूनपर्यंत ग्रामसेवक गावात आला नाही. याशिवाय तक्रारदाराच्या नातेवाईकांना फोन करून ‘माझ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार का दिली? तुमचे व तुमच्या नातेवाइकांची नावे चिठ्ठीत लिहून जीवाचे बरेवाईट करतो’, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद तक्रारदाराने मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली असून, बारगळ याला अटक करण्यात आली आहे.


























































