कोपरगावमध्ये पोलिसांचे सशस्त्र संचलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातून पोलिसांचे सशस्त्र संचलन करण्यात आले. संवेदनशील कोपरगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी व सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर कोपरगाव शहरात पोलिसांचे सशस्त्र संचलन करण्यात आले.

आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या अनुषंगाने मोहरम मिरवणुक मार्ग व गणेश विसर्जन मिरवणुक मार्गाने पथसंचलन करण्यात आले. पथ संचलनासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे 2 पोलीस अधिकारी ,15 पोलीस कर्मचारी,25 होमगार्ड , एसआरपीएफ तुकडीचे 2 पोलीस अधिकारी 50 पोलीस कर्मचारी, पोलीस मुख्यालय येथील बँड पथकाचे 12 पोलीस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव शांततेत व भक्तीमय वातावरणात साजरा करावा. मुख्यतः गणेश मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या गणेश मंडपाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी. मंडपातील लाईटचे डेकोरेशन सुरक्षित असावे या तसेच या उत्सव कालावधीत व गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढावी. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी काळजी घ्यावी. गणेशोत्सव शांततेत व भक्तीमय वातावरणात साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी केले.