नगरमध्ये मतदान यंत्रावर अभिरुप मतदानास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
evm-f

विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्रांवर मंगळवारपासून नगरमध्ये अभिरूप मतदान (मॉक पोल) घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक शाखेने यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवले होते. प्रत्यक्षात काँग्रेस व शिवसेना या दोन राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पहिल्या दिवशी उपस्थित होते. निवडणूक शाखेतून याबाबत माहिती देण्यात आली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीची जिल्हा निवडणूक शाखेची तयारी पूर्ण झाली आहे. विधाससभा निवडणुकीसाठी मिळालेल्या मतदानयंत्रांचे प्रथमस्तरीय तपासणीचे काम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. या मतदानयंत्रांबाबत मनामध्ये कोणतीही शंका राहू नये, मतदान यंत्र व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री पटावी, यासाठी निवडणूक शाखेने अभिरुप मतदानाचे आयोजन केले. यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्‍या एकूण मतदानयंत्रांपैकी पाच टक्के मतदान यंत्रावर अभिरुप मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन टक्के मतदान यंत्रावर एक हजार मतदान, एक टक्के मतदान यंत्रावर बाराशे मतदान आणि दोन टक्के मतदान यंत्रावर पाचशे मतदान, याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. अभिरुप मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण झालेले मतदान व व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या यांची तपासणी करून खात्री करण्यात येणार आहे. मंगळवारपासून अभिरुप मतदानाची प्रक्रिया सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी शिवेसेना व काँग्रेस या दोन राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींसमोर अभिरुप मतदान घेण्यात आले आहे.