Mollywood Me Too – लैंगिक शोषणाच्या आरोपांनी मल्याळम सिने इंडस्ट्री हादरली, 17 प्रकरणं आली समोर

लैंगिक शोषणाच्या आरोपांनी मल्याळम फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. आतापर्यंत लैंगिक शोषणाच्या आरोपांची 17 प्रकरणे समोर आली आहेत. या आरोपांनंतर मल्याळम चित्रपट कलाकारांची संघटना ‘AMMA’ सुद्धा बरखास्त करण्यात आली आहे. या आरोपांनंतर आता मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांची पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाची प्रकरणं, अनेक तक्रारी आणि न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल, यामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठे वादळ निर्माण झाले आहे. अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अभिनेत्री सोनिया मल्हारने आरोप केला आहे की, 2013 मध्ये एका सिनेमाच्या सेटवर एका अभिनेत्याने तिचा विनयभंग केला होता. केरळ सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकासमोर अभिनेत्रीने तिची तक्रार केली आहे. केरळ सरकारने मॉलीवूडमधील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. सोनिया मल्हारपूर्वी चित्रपट अभिनेत्री मीनू मुनीर हिनेही लैंगिक छळाचे आरोप केले होते. मीनू मुनीरचा दावा आहे की, आता तिला धमकीचे मेसेज येत आहेत. मीनूने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. विशेष तपास पथक लवकरच मीनू मुनीरचा जबाब नोंदवून घेणार आहे.

मल्याळम चित्रपट अभिनेता सिद्दीकी याच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. सिद्दीकी यांच्यावर 2016 मध्ये एका चित्रपट अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हायप्रोफाईल फिल्मस्टारविरुद्धची ही दुसरी एफआयआर आहे. मल्याळम चित्रपट उद्योगातील अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोपही झाले आहेत. न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल गेल्या आठवड्यात सार्वजनिक झाल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांवर आरोप झाले. 235 पृष्ठांच्या अहवालात असे म्हटले आहे की, मल्याळम चित्रपटसृष्टीवर 10-15 पुरुष निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांचे नियंत्रण आहे. राज्य सरकारने 2017 मध्ये तीन सदस्यीय न्यायमूर्ती हेमा समिती स्थापन केली आणि 2019 मध्ये अहवाल सादर केला. हा अहवाल आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आला नाही. कारण त्याच्या प्रकाशनावर कायदेशीर आव्हाने होती.