
देशात कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. मंगळवारी केरळमध्ये या विषाणूचा पाचवा रुग्ण आढळला, तर दिल्लीत तिसरा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या दोन रुग्णांमुळे देशातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. या वाढत्या संसर्गामुळे राज्यांबरोबरच केंद्र सरकार सतर्क झाले आहे.
दिल्लीत आढळलेला रुग्ण मूळचा नायजेरियाचा असून तो सध्या दिल्लीत राहतो. याआधीच्या दोन रुग्णांपैकी एकजण आफ्रिकेतून दिल्लीत आला होता. तसेच दुसरा रुग्ण 35 वर्षीय तरुण काही दिवसांपूर्वी मनालीला फिरायला गेला होता. तोसुद्धा मूळचा नायजेरियाचा असून सध्या हिंदुस्थानात वास्तव्याला आहे. केरळमध्ये आढळलेला पाचवा रुग्ण हा 27 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातमधून घरी परतला होता. केरळमध्ये आल्यानंतर त्याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याला मलप्पुरम जिह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या आई-वडिलांसह संपर्कात आलेल्या इतर लोकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. मंकीपॉक्सने केरळात 30 जुलैला एका रुग्णाचा बळी घेतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने संसर्ग रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.
केंद्र सरकार अॅलर्ट मोडवर; विशेष टास्क फोर्सची स्थापना
केरळ व दिल्लीत मंकीपॉक्सची रुग्णसंख्या वाढत आहे. याचदरम्यान केरळात एका नागरिकाचा संसर्गामुळे मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने मंकीपॉक्सचा फैलाव रोखण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार केला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या नेतृत्वाखाली हा टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे.

























































